भरधाव दुचाकीची पादचाऱ्यास धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

0
461

खेड, दि. ०६ (पीसीबी) – भरधाव दुचाकीने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेठाण येथे महिंद्रा सीआयइ कंपनीच्या समोर घडली.

तानाजी अभिमान डिसले (वय 37, रा. आंबेठाण, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तरेश्वर महादेव महाकुंडे (वय 38, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालक मोकबूल अली लष्कर (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी डिसले हे फिर्यादी महाकुंडे यांच्याकडे काम करत होते. सोमवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर ते रस्त्याने पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपी त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून भरधाव आला. त्याने तानाजी यांना जोरात धडक दिली. यामध्ये तानाजी हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.