भरधाव दुचाकीचा अपघात

0
279

दुचाकीस्वार ठार, सहप्रवासी गंभीर जखमी

दिघी, दि. 04 (पीसीबी) – नवीन वर्षातील प्राणांतिक अपघाताची पहिली घटना दिघी येथे घडली. १ जानेवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास स्पोर्ट बाईकवरून भरधाव वेगात जात असताना दुचाकीचा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात दिघी पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावर पुणे-आळंदी रोडवर घडला.

आशिष पुरणलाल केळकर (वय ३०, रा. चऱ्होली बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर बसवराज पतन शेट्टी (वय २८) असे गंभीर जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश कळंके यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आणि त्यांचा मित्र बसवराज हे १ जानेवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजता पुणे-आळंदी रोडने केटीएम बाईकवरून भरधाव वेगात जात होते. दिघी पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावरून जात असताना आशिष याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात आशिषचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला बसवराज हा गंभीर जखमी झाला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.