भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात वडिलांचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी

0
62

अंबरनाथ, दि. 28 (पीसीबी) : अंबरनाथमधुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.अंबरनाथ चिखलोली परिसरात एमआयडीसीच्या बेजबाबदारपणामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमआयडीसीच्या बंद पडलेल्या एअरवॉलमुळे आणखी एका बळी गेला आहे. या परिसरात दुचाकीला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये पित्याचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पारसनंद पाल असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहित अशी की, अंबरनाथ परिसरातील ऑरचिड स्वेकर सोसायटीत राहणारे पारसनंद पाल हे सकाळच्या सुमारास उल्हासनगरला जात असताना जांभूळ फाटा रोडवर ही दुर्दैवी घटना घडली. पारसनंद पाल आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव विटांनी भरलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये पारसनंद पाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाया आहे. तर पारसनंद यांचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

एमआयडीसीच्या बेजबाबदारपणामुळे बळी

दरम्यान, असे अपघात या रोडवर नेहमीच होत असल्याचे चित्र आहे. याला पालिका प्रशासन आणि एमआयडीसीचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा रोष आहे. जांभूळ फाटा रोडवर एमआयडीसीचा बंद पडलेल्या पाइप लाइनच्या एअरवॉलमुळे अनेकदा या परिसरात अपघात होत आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही याबाबत काही एक उपाय करण्यात आले नाही. केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष केल्यानेच असे अपघात घडत असून यामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जातं असल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत.