भरधाव टेम्पोची पादचारी दाम्पत्यास धडक; महिलेचा मृत्यू

0
210

पुणे, दि. ५ (पीसीबी)- भरधाव टेम्पोने पादचारी पती-पत्नीला धडक दिली. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 3) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास डांगे चौक येथे घडला.

लता संतोषकुमार कांबळे (वय 52) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोषकुमार रामचंद्र कांबळे (वय 52) असे जखमी पतीचे नाव आहे. याप्रकरणी जावेद रेहमान शेख (वय 27, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी रात्री त्यांच्या कारमधून जात होते. डांगे चौक येथे रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव चालवून रस्त्याने पायी जात असलेल्या लता आणि संतोषकुमार या दाम्पत्यास धडक दिली. त्यामध्ये लता यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर संतोषकुमार हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर टेम्पो चालकाने फिर्यादी यांच्या कारला धडक देऊन कारचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.