भरधाव टँकरची दुचाकीला धडक; दुचाकी वरील सहप्रवाशाचा मृत्यू

0
106

महाळुंगे, दि. 12 जुलै (पीसीबी) – भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकी वरील सहप्रवाशाच्या पोटावरून टँकरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या सहप्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 11) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील सावरदरी गावच्या हद्दीत एअर लिक्विड चौकात घडली.

पवन राजेश गेडाम (वय 29, रा. महाळुंगे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी भीम शेषराव जाधव (वय 19, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालक विशाल ज्ञानेश्वर तरस (वय 37, रा. सावरदरी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीम आणि पवन गेडाम हे दुचाकीवरून महाळुंगे एचपी चौकातून वासुली मार्गे मिंडेवाडी येथे जात होते. सावरदरी गावच्या हद्दीत एयर लिक्विड चौकात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरने भीम यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये भीम आणि त्यांच्या दुचाकी वरील सहप्रवासी पवन हे रस्त्यावर पडले. दरम्यान टँकरचे चाक पवन यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.