रायगड, दि. ११ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत. उद्या (शनिवारी) ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाच्या दरम्यानच होत असलेल्या या गाठी-भेटीमुळे, जेवण आणि चर्चा यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून, डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा सुटू शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर दुसरीकडे भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळालं नाहीत तर मोठा उठाव होईल असं म्हणत अमित शाहांच्या रायगड दौऱ्याआधीच शिंदेंच्या आमदाराचा इशारा दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्हा पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत बोलताना, आम्हाला निश्चित न्याय मिळेल. उद्या देशाचे संरक्षण मंत्री अमित शहा यांचा नियोजित दौरा आणि सुतारवाडीत भोजन कार्यक्रम आहे. मात्र, बंद दाराआड चर्चा करण्याची काहीच गरज नाही. आम्ही सगळे रायगड वासीय आशावादी आहोत. भरत गोगावले यांच्या रूपाने पालकमंत्री पद मिळेल, खरं तर खूप उशीर झाला आहे. तुम्हाला रायगडचा मागच्या परिवर्तनातील इतिहास ज्ञात आहे. प्रोटोकॉलनुसार गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना ही पद मिळणे अपेक्षित आहे. सुनील तटकरे यांचा नेहमीच हव्यास असतो. मात्र, कदाचित भविष्यात भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळाले नाही तर मोठा उठाव होईल असं म्हणत आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला आहे. सध्या रायगडच्या राजकारणात पालकमंत्री पद खेचून आणण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाल्याचं चित्र आहे.
आम्ही आशावादी आहोत. आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय, अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. सकारात्मक निर्णय घेतला जाईल भरत गोगावसे चार टर्म आमदार राहिले आहेत, मग आता दोन टर्मच्या आमदाराला पालकमंत्रीपद द्यायचं ते वरिष्ठ ठरवतील. आमच्या नेत्याला न्याय मिळाला नाही, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नाही तर आम्ही नक्कीच उठाव करू असंही शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.
भरत गोगावले काय म्हणालेत?
अमित शाह यांच्या सुतारवाडी दौऱ्यावर भाष्य करताना भरत गोगावले पुढे म्हणाले, अमित शाह यांना सुनिल तटकरे यांनी जेवणाचे निमंत्रण दिले आणि या निमंत्रणाला त्यांनी होकार दिला. अशावेळी जाण क्रमप्राप्त असते, परंतु तिथे गेले म्हणजे पालकंत्री पदाचा तिढा सुटला असं होत नाही, अमित शाह हे रायगडावर येत आहेत, त्याचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो. राजकारणात कोणी कोणाची वाढवू शकतो. आमचे एकनाथ शिंदे यांची सुद्धा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे काळजी करण्याची आम्हाला गरज नाही.