भयंकर, मराठा आरक्षणासाठी बार्शी तालुक्यात चौघा तरुणांनी केले विष प्राषन

0
372

सोलापूर, दि. १ (पीसीबी) : मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर जिल्ह्यात वाढत असताना बार्शी तालुक्यातील देवगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चौघाजणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे माळी समाजाच्या कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्यामागील कारण मराठा आरक्षणाची मागणी असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बार्शी तालुक्यात देवगाव येथे तणनाशक प्राशन केलेल्या रणजित ऋषिनाथ मांजरे (वय २९), प्रशांत मोहन मांजरे (वय २८), योगेश भारत मांजरे (वय ४०) आणि दीपक सुरेश पाटील (वय २६) अशी चौघांची नावे आहेत. हे चौघेही मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होते.

रात्री रणजित मांजरे याने तणनाशक प्राशन केल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्यास बार्शीत एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रशांत मांजरे, दीपक पाटील व योगेश मांजरे हे रूग्णालयात गेले होते. त्यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे उद्विग्न होऊन रूग्णालयाच्या आवारातच विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या ३० ऑक्टोबर रोजी देवगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. त्यात रणजित मांजरे हा सहभागी झाला होता. दरम्यान, अर्ध्या वाटेत तो मोर्चातून निघून गेला. नंतर त्याने तणनाशक प्राशन केल्याचे त्याच्या काही मित्रांना समजले. त्यानंतर त्याचा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याला भेटण्यासाठी आलेल्या अन्य तिघांनीही विष प्राशन केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, बार्शीचे उपविभागीय पोलीस जालिंदर नालकुल, बारूशी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी तसेच एकनाथ शिंदेचलित शिवसेनेचे स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी रूग्णालयात धाव घेऊन चारही तरूणांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मराठा समाजासाठी माळी समाजाच्या तरूणाने गळफास
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय राहिलेल्या विलास कृष्णा क्षीरसागर (वय २४) या माळी समाजाच्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विलास क्षीरसागर हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होता. काल झालेल्या आंदोलनातही त्याचा सहभाग होता. उद्विग्न होऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत विलास हा मूळचा ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील राहणारा होता. तो गेली १८ वर्षे तारापूर येथे संतोष शेळके यांच्या शेतात काम करायचा. तो गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचा. यापूर्वी २०१६ साली झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात तो सहभागी झाला होता.

सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेताना गेल्या चार-पाच दिवसांपासून तो अस्वस्थ होता. आपणदेखील मराठा आंदोलनात बलिदान देणार असल्याचे तो सांगायचा. गावात शासनाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली असता विलास क्षीरसागर याने चितेत उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी, मृत विलासच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी आणि दहा लाख रूपयांची शासकीय मदत मिळवून देण्याची लेखी हमी दिल्यानंतर मृत विलासच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले