भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) येथे बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथे ही घटना घडली. या घटनेत अक्षय प्रकाश चव्हाण (रा. धायरी) गंभीर जखमी झाला आहे. या वेळी कुत्र्यांनी तरुणाच्या शरीराचे लचके तोडले.
नऱ्हे- वडगाव रस्त्यावरील एका वाइन शॉपशेजारील रस्त्यावर अक्षय चव्हाण आणि त्याचा मित्र सुनील बावधने आले होते. मद्यप्राशन केल्यामुळे अक्षयचा तोल जाऊन तो जमिनीवर पडला. तो खाली पडताच परिसरातील सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हिंस्र हल्ला केला. मद्यधुंद अवस्थेत तोल जाऊन पडलेल्या या तरुणाला कुत्र्यांच्या टोळक्याने १० फूट फरपटत नेले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. अक्षय नशेत असल्याने त्याला कुत्र्यांचा प्रतिकार करता आला नाही.
कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे, विशेषतः कान, नाक यांचे लचके तोडले. या हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ होऊन बेशुद्धावस्थेत तिथेच पडून राहिला. हल्ला पहाटे झाला, तरी अक्षय सकाळी नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर पडून होता. नागरिकांनी त्याला पाहूनही कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर, सकाळी नऊ वाजता स्वच्छता कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सध्या अक्षयवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. महापालिकेने तत्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.











































