निगडी (पिंपरी चिंचवड) दि.१८
समरसता गतिविधी आणि भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील व्यक्तींना जात दाखले वाटप समारंभ दत्तोपंत म्हसकर न्यास सभागृह निगडी येथे नुकताच संपन्न झाला.तथागत भगवान गौतम बुद्धपौर्णिमा आणि गोरक्षनाथ जयंतीचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन निगडी येथील दत्तोपंत म्हसकर न्यास संस्थेच्या भव्य सभागृहात करण्यात आले होते.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीषजी प्रभुणे होते तर व्यासपीठावर पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, समरसता गतिविधि पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंडळ सदस्य विलास लांडगे आणि भटके विमुक्त परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या (महिला आयाम) सौ. शुभांगी तांबट प्रामुख्याने उपस्थित होत्या.
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला आणि भगवान गोरक्षनाथ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समरसता गतिविधी प्रांत कार्यकारिणी सदस्या वेणू साबळे यांच्या सुस्वर बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली , जात प्रमाणपत्र वितरीत करण्यासंदर्भांत भूमिका परिषदेचे हितरक्षक जितेंद्र ठाकूर यांनी मांडली पालावरच जिण जगत असलेल्या भटक्या समजला जात प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी आणि समस्यांचा पाढाच वाचत परिषदेने समाजाच्या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांची उजळणी केली आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीचे आणि गृह भेटीचे महत्व प्रतिपादन केले.
ॲडव्होकेट मुकुंद यदमळ यांनी भटके विमुक्त परिषद स्थापनेची गरज का भासली हे सांगत भारतातील समग्र भटके विमुक्त समाजातील समस्यांचा आढावा घेत शासकीय पातळीवर परिषदेने केलेल्या कामाचा लेखा जोखा सादर केला . नरेंद्र पेंडसे यांनी नाथ संप्रदायाचे महत्व सांगत भटके विमुक्त समाजाला नाथ संप्रदायाचा समृद्ध वारसा असल्याचे सांगत हीच परंपरा ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्गात आणि खऱ्या अर्थाने समरसतेत विलीन केली असे सांगत समस्या आणि समस्या समाधान याचा आढावा घेतला.
विलास लांडगे यांनी भटके विमुक्त समाज नाथ संप्रदाय गौतम बुद्ध आणि समरसता यांचे नाते उलगडून सांगितले.
सौ. शुभांगी तांबट यांनी भटके विमुक्त समाजातील महिलांच्या समस्या सांगत समजतील सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करीत बराच समाज अजूनही जात दाखल्या वाचून वंचित असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
तहसीलदार जयराज देशमुख यांनी परिषदेने केलेल्या सर्वेक्षणाचे कौतुक केले आणि शासकीय योजनांसाठी जात पडताळणी दाखला प्राप्त करावा असे सांगत समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देत समाजासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
अध्यक्षीय भाषणांत गिरीषजी प्रभुणे यांनी भटके विमुक्त समाजातील बलस्थाने आणि परंपरेने चालत आलेल्या समृद्ध कौशल्य ज्ञान संपदेचा आढावा घेत ब्रिटिश राजवटीमुळे समाज देशोधडीला लागल्याचे सांगत स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही समाजासाठी खूप काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. समाजासाठी जात दाखल्याचे महत्व किती महत्वाचे आहे हे पटवून देत तहसीलदार जयराज देशमुख यांचे मनापासून कौतुक करत ऋण व्यक्त केले.
श्रोत्यामध्ये श्री खंडोबा श्री क्षेत्र जेजुरी संस्थान अध्यक्ष अनिल सौंदडे, मातंग साहित्य परिषद अध्यक्ष धनंजय भिसे , भटके विमुक्त परिषदेचे प्रशांत शास्त्रबुद्धे,समरसता गतिविधी संयोजक सोपान कुलकर्णी उपस्थित होते.
परिषदेचे कार्यवाह ललित कासार यांनी आभार प्रदर्शन केले. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील युवक युवती आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.