भगवद्गीता जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ! -शंकर गायकर

0
2

पिंपरी, दि. २३ – ‘भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी महासाधू मोरया गोसावी क्रीडासंकुल, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल – पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित हिंदू स्वाभिमान मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकर गायकर बोलत होते. यावेळी इस्कॅान मंदिर, रावेतचे प्रमुख गोपती दास, विश्व हिंदू परिषद प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, नितीन वाटकर, प्रांत उपाध्यक्षा माधवी सौंशी, परेश पटेल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मैदानात उपस्थिती होती.

शंकर गायकर पुढे म्हणाले की, ‘अर्जुन नैराश्यात गेल्यावर भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून केलेला उपदेश हा मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गीताविरहित भारत ही कल्पनादेखील आपण करू शकत नाही. जोपर्यंत चंद्र – सूर्य अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भगवद्गीता भारतात राहील. छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजीमहाराज, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह सर्व क्रांतिकारकांना लढण्याची प्रेरणा भगवद्गीतेने दिली आहे. ‘मराठा’ हा शब्द शौर्याचे प्रतीक आहे; तसेच देशासाठी सर्वस्व समर्पित करणारे दल म्हणजे बजरंग दल होय!’ गायकर यांनी आपल्या विस्तृत व्याख्यानातून संभाजीमहाराज, सावरकर आणि रामप्रसाद बिस्मिल यांचा इतिहास कथन केला.
गोपती दास यांनी, ‘विश्व हिंदू परिषद जगातील अनेक देशात कार्यरत असून इस्कॉन सुमारे १३० देशांमध्ये धर्मरक्षणाचे कार्य करीत आहे. असंख्य साधूसंत आणि देशभक्त यांनी आपल्या बलिदानातून धर्म टिकवला आहे. त्यामुळे तो वृद्धिंगत करण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे!’ असे आवाहन केले. यावेळी बजरंग दलाची माहिती नितीन महाजन, मातृशक्ती आयामाची माहिती प्रिया रसाळ, दुर्गा वाहिनीची माहिती सोनाली नाथ, सेवा विभागाची माहिती डाॅ. शर्वरी एरगट्टीकर, धर्मप्रसार आयामाची माहिती ॲड. मृणालिनी पडवळ, विधी प्रकोष्टची माहिती ॲड. संकेत राव यांनी दिली; तर किशोर चव्हाण यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना, उद्देश व भूमिका विशद केली. जिल्हा मंत्री धनंजय गावडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. संभाजी बालघरे, नवनाथ साकोरे , किरण शिंदे, तेजस्विनी डोमसे, मधुसूदन जैन, अरविंद लंघे, पन्नालाल जाधव, कौशल रावळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. परेश पटेल यांनी आभार मानले.