भक्ती शक्ती चौकातील भूखंड वाचवण्यासाठी अजित पवार यांना साकडे

0
207

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – भक्ती शक्ती चौकातील भूखंड वाचवण्यासाठी आज विविध संस्था संघटनांच्या वतीने विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना साकडे घालण्यात आले. स्वतः अजित पवार यांनी त्याबाबत सविस्तर माहिती घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच भाऊसाहेब आडागळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, गणेश भांडवलकर, संतोष वाघे यांनी मुंबई येथे अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा केली. हे मैदान वाचविण्यासाठी त्यांना वस्तुस्थिती काय आहे ते समजावून सांगितले आणि मागण्यांचे एक लेखी निवेदनही दिले.

अजित पवार यांच्याकडे केलेल्या मागण्या अशा –
१) या शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाचा भूखंड बाबत पी एम आर डी ए व बांधकाम व्यवसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत.
२) या जागेत राज्य सरकार महानगरपालिका व पी एम आर डी ए ने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भव्य दिव्य “शिवसृष्टी” उभारण्यात यावी.
३) मनपाच्या वतीने होणारी शिवजयंती सालाबाद प्रमाणे याच जागेवर व्हावी.
४) मनपाच्या वतीने होणारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव याच जागेवर व्हावी.
५) भक्ती शक्ती शिल्पसमूहासमोरील पी एम पी एल डेपोच्या जागेवर मेट्रोचे अखेरचे स्टेशन होणार. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा याच जागेत बसवण्यात यावा
६) मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांसाठी या जागेचा वापर करण्यात यावा.
७) समस्त निगडी ग्रामस्थांच्या “गाव जत्रेचा” आदि कार्यक्रम याच जागेत होवा
८) जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे पालखी विसाव्यासाठी या जागेचा वापर व्हावा

यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासमोर वरील सर्व विषयांबाबत सविस्तर माहिती दिली. पवार यांनी तत्काळ त्यांचे खाजगी सचिव श्री मुसळे यांना पी एम आर डी ए चे आयुक्त राहुल महिवाल यांना फोन लावण्यात सांगितला. श्री पवार यांनी ही जागा पिंपरी चिंचवड शहरातील ओळख असणाऱ्या भक्ती शक्ती शिल्पसमूहा लगत असून या जागेवर शिवजयंती उत्सव, लोकशाहीर आण्णाभाऊ जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात होतात. खरे तर अशा पालखी मार्गालगत राखीव ठेवल्याच पाहिजे. पुढे जर अशा जागा ठेवल्या नाही तर सांस्कृतिक,आध्यात्मिक कार्यक्रम पुढे कसे होणार. भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे पुढील काळात पिंपरी चिंचवड शहरात हा विषय संवेदनशील होऊ शकतो. त्यामुळे मी आमचे खाजगी सचिव श्री चौबे यांना आपल्याकडे या समितीच्या कार्यकर्त्यांन सह पाठवत असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि ही जागा सार्वजनिक उपक्रमाकरिता राखीव रहावी. यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी सूचना दिली.