भक्तिरसात भाविक तल्लीन

0
20

पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव – द्वितीय पुष्प

पिंपरी,दि. २९ – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी यांनी ‘स्वरसमर्थ अभंगवाणी’ या सांगीतिक भक्तिसंगीताच्या मैफलीच्या माध्यमातून बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी द्वितीय पुष्पाची गुंफण केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गतिराम भोईर, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

“राम हैं स्वामी, रहीम हैं स्वामी…” या स्तवनातून श्री स्वामी समर्थ आणि दत्त संप्रदायातील सत्पुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. “दत्त दिगंबर नाम निरंतर…” , “तव नामाच्या घोषाने लाभे आत्मानंद…” , “अक्कलकोटी आलो तुमच्या दारात…” अशा प्रत्येक भक्तिरचनांच्या प्रारंभी अन् शेवटी ‘महाराज श्री स्वामी समर्थ’ अथवा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ यासारख्या नामघोषांचा अंतर्भाव केल्याने नकळत भाविक श्रोत्यांनी टाळ्यांचा ठेका धरीत साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाच्या वतीने स्वामी समर्थ शक्तिपीठाचे डॉ. गणेश शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानाला उत्तर देताना डॉ. गणेश शिंदे यांनी, ‘भक्ती ही अध्यात्मापुरती मर्यादित न ठेवता तिचा व्यवहारातही उपयोग करावा!’ असे आवाहन केले.

मैफलीच्या उत्तररंगात
“स्वामींच्या दरबारी काय कमी?…” , “नरसोबाच्या वाडीला जाऊ चला…” , “निघालो घेऊन दत्ताची पालखी…” या लोकप्रिय भजनाने भक्तिरंग अजूनच गडद झाला. स्वामी समर्थ यांचे शिष्य शंकरमहाराज यांच्या लीला वर्णन करणाऱ्या गीतांमध्ये अजीज नाझा यांच्या आवाजातील “चढता सूरज…” या लोकप्रिय कव्वालीच्या शैलीत सादर झालेली “आज बाबा शंकरजी सामने हमारे हैं…” ही कव्वाली श्रोत्यांना विशेष भावली. रसिकाग्रहास्तव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा…” हे भजन समरसून सादर करीत मुकुंद बादरायणी यांनी श्रोत्यांना पंडितजींच्या आवाजाची अनुभूती दिली. मैफलीचा समारोप करताना त्यांनी “हम गया नही, जिंदा हैं…” हा स्वामींचा संदेश कव्वालीच्या माध्यमातून भाविकांना दिला; तसेच “स्वामी कृपा कधी करणार?” या भैरवीने उपस्थितांना अंतर्मुख केले. डॉ. लक्ष्मण अवधानी आणि ओंकार कुलकर्णी यांनी स्वरसाथ केली. सर्वेश बादरायणी (तबला), सुजीत लोहर (पखवाज), ज्योत्स्ना क्षीरसागर (संवादिनी), मकरंद बादरायणी (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी यांनी मुकुंद बादरायणी यांच्या गायकीचे समीक्षण करीत गौरवोद्गार काढले.

प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा धन्वंतरी अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास गावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सत्संग मंडळाचे सदस्य कैलास भैरट यांनी आभार मानले.