भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून अडीच कोटींचा निधी देण्याचा संकल्प

0
234

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – भंडारा डोंगरावर नागरशैलीत आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी एक कोटी रुपयांच्या निधींचा धनादेश भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला. तर, येत्या काही दिवसात दीड कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे.

माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगरावर अखंड गाथा पारायण सोहळा संपन्न झाला. सोहळ्याच्या सांगतादिनी खासदार बारणे यांनी एक कोटी रुपयांचा निधी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्याकडे सुपूर्द केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, भंडारा डोंगरावर भव्यदिव्य असे मंदिर उभारले जात आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची चार फूट उंचीची मूर्ती ही समोरच्या बाजूला बसविण्यात येणार आहे. मंदिरात भक्तांसाठी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. मंदिराच्या मंडपावर व भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीवकाम केलेले असणार आहे. मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून होत आहे. मंदिरासाठी मी स्वनिधीतून काही आणि लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपये निधी देण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. उर्वरित दीड कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसात देण्यात आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे येऊन मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी. जेणेकरून मंदिराचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर मंदिराचे काम चालले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी मंदिरासाठी अडीच कोटी रुपये निधी देण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यापैकी एक कोटीचा निधी काल्याच्या दिवशी दिला आहे. येत्या काही दिवसात उर्वरित निधी देण्याचे जाहीर केले आहे. मागील 20 वर्षांपासून खासदार बारणे यांची मंदिर कार्यासाठी वेळोवेळी मदत झाली. मंदिर विकास, रिंगरोड,जमीन आरक्षण, शासकीय निधीतून विकास कामांसाठी सक्रियपणे मदत केली. शासकीय जमीन अधिगृहण करुन विकास आराखडा राबविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित मंत्री, शासकीय अधिका-यांकडे पाठपुरावा केला आहे.