भंगार खरेदीच्या वादातून भंगार व्यावसायिकाचा खून

0
1369

चिखली, दि. ०४ (पीसीबी) – कंपनीचे भंगार खरेदी करण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका भंगार व्यावसायिकाचे कुदळवाडी येथून अपहरण केले. अपहृत व्यक्तीचा चऱ्होली येथे संरक्षण विभागाच्या जागेतील जंगलात नेऊन खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 28 सप्टेंबर) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

सफीउद्दिन मोहम्मद शरीफ खान (वय 40, रा. कुदळवाडी, चिखली), मोहम्मद अनिस (रा. मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिराज अहमद अबुल हसन खान (वय 40, रा. कुदळवाडी, चिखली) असे अपहरण आणि खून झालेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. निजाम अहमद अब्दुल हसन खान (वय 42, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात सिराज खान नावाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चिखली पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. सिराज खान याच्या ओळखीचे लोक, मित्र यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान कुदळवाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना सिराज हा 28 सप्टेंबर रोजी त्याचा मित्र सैफुद्दीन याच्यासोबत मोशीच्या दिशेने गेल्याचे आढळले.

त्यानुसार पोलिसांनी सैफुद्दीन याला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा कबूल केला. सिराज आणि सैफुद्दीन हे दोघेही भंगार व्यवसायिक आहेत. कंपनीचे भंगार घेण्यावरून त्यांच्यात दीड महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर सिराजने सैफुद्दीनला दमदाटी करून कुदळवाडी येथील काही मुलांना मारण्यासाठी सैफुद्दीनकडे पाठवले होते.

भविष्यात सिराजकडून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शंका सैफुद्दीन याच्या डोक्यात होती. त्यामुळे त्याने त्याचा मुंबई येथील मित्र अनिस याला बोलावून घेतले. त्याला चऱ्होली येथे थांबवून सैफुद्दीन याने सिराज याला भंगार घेण्याचे खोटे कारण सांगून दुचाकीवरून चऱ्होली येथे नेले. तिथे संरक्षण विभागाच्या जागेतील जंगलात अरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला निर्जन स्थळी नेऊन सिराज यांच्या डोक्यात आणि तोंडावर हातोडीचे घाव घालून त्यांचा खून केला. सिराजचा मृतदेह तिथेच जंगलात टाकला असल्याचे सैफुद्दीन याने सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी भर पावसात जंगल परिसरात चार तास पाहणी करून मृतदेह शोधला. सतत पडणारा पाउस आणि दलदल यामुळे मृतदेह कुजला होता. मृताच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर चिखली पोलिसांचे एक पथक मुंबई येथे रवाना झाले. पोलिसांनी अनिस याला मुंबई मधून ताब्यात घेतले. दरम्यान तो उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक बारावकर, सहायक फौजदार ए डी मोरे, पोलीस अंमलदार शिंदे, गर्जे, शिर्के, ताराळकर, सावंत, साकोरे, सुतार यांच्या पथकाने केली