पिंपरी, दि.२५ – लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक व संस्थांचा “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मान करण्यात आला.
हाऊस ऑफ कॅामन्स, ब्रिटिश पार्लमेंट लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट च्या सीईओ डॅा. परिन सोमाणी, खासदार बॉब ब्लॅकमन व गाम्बिया चे राजकुमार महामहिम इब्राहिम सान्यांग यांच्या हस्ते बाणेर, पुणे व अहिल्यानगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. हरके हे १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय आहेत. भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध विश्वविक्रम केले आहेत. डॉ. हरके यांना यापूर्वी अनेक देशात पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये लंडन मधील ८ पुरस्कार यामध्ये ब्रिटिश पार्लमेंट व ऑक्सफर्ड विद्यालयात त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले आहे. दुबई मध्ये ५ पुरस्कार, बँकॉक मध्ये ३ आणि नेपाळ मध्ये २ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच रशिया, स्वित्झर्लंड, मलेशिया व श्रीलंकेमध्येही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. हरके यांच्या कार्याची दखल मार्च २०२० मध्ये विश्वविख्यात फोर्ब्स मासिकाने देखील घेतली होती. डॉ. हरके हे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या संस्थेच्या संपर्कात आले व नंतर त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले आहे. ते पूर्णवेळ ध्यानधारणेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य जगभरात करत आहेत. ब्रिटिश पार्लमेंट मध्ये डॉ. दीपक हरके यांना सन्मानित केल्यामुळे बाणेर, पुणे आणि अहिल्यानगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या सेंटरमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.