दि. १० ऑगस्ट (पीसीबी) – ब्राझीलमधील साओ पावलो इथं एक थरकाप उडवणारा विमान अपघात घडला. या विमान अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला. दोन इंजिन असलेलं वोपास एअरलाइनचं हे विमान ब्राझीलच्या दक्षिणेकडील पराना येथील कॅस्केवेल कडून साओ पावलो शहराकडं जात होतं. मात्र मध्येच विन्हेडो या शहाराजवळ गिरक्या घेत हे विमान कोसळलं आणि विमानातील ५७ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स या सगळ्यांचाच या अपघातात मृत्यू झाला. सोशल मिडियावर हे विमान कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हे विमान कोसळल्याने एका घराचं नुकसान झालं. मात्र सुदैवाने जमिनीवरील कुणालाही इजा झाली नाही. या अपघाताचे व्हिडीओज समोर आले असून अपघातस्थळी कोसळलेल्या विमानाचा मलबा तसंच मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याचं दिसत आहे. एटीआर या फ्रेंच-इटालीयन विमान कंपनीनं या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय.