ब्रम्हास्त्र चित्रपटाचा गल्ला ३०० कोटींवर…!

0
378

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ब्रह्मास्त्र चित्रपट चांगलाच चालत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करीत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती, हे विशेष…

तरण आदर्शसारख्या समीक्षकांनी हा चित्रपट निराश करणारा आहे असे मत नोंदवले होते. असे असतानाही ब्रह्मास्त्र चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला जमवणे हे या चित्रपटाच्या सगळ्या टीमसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. करण जोहरने चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आलेल्या काही बिग बजेट चित्रपटांना बहिष्काराच्या मोहिमेमुळे मोठा फटका बसला होता. आमिर खान आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट फ्लॉप झाला. मात्र, यावर चित्रपट समीक्षकांची वेगवेगळी मते होती. यामुळे ब्रह्मास्त्रचे काय होणार? याकडे बॉलिवूडचे लक्ष लागले होते.
ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३६ कोटींची कमाई केली होती. चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
पहिल्या वीकेंडमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ब्रह्मास्त्रने आणखी एक टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रह्मास्त्रच्या निव्वळ कलेक्शनबद्दल बोलायचे तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर नेटची कमाई २९० कोटींपेक्षा थोडी जास्त आहे.