बौद्ध समाजाला भाजपशी जोडण्यासाठी संपर्क यंत्रणा राबवणार : ॲड. क्षितिज गायकवाड

0
362

ॲड. क्षितिज गायकवाड यांचा भाजप मध्ये प्रवेश

पिंपरी, दि. १५ – भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भिवंडी येथे भाजपच्या प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी ॲड. क्षितिज गायकवाड यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय आदींसह राज्यातून आलेले पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲड. क्षितिज गायकवाड हे व्यवसायाने वकील असून त्यांनी यापूर्वी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष, शहर काँग्रेसचे अनुसूचित विभागाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच देहूरोड येथील धम्मभुमी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करीत आहेत. ॲड. क्षितिज गायकवाड यांचा चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे त्याचा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला निश्चित फायदा होईल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

भाजप प्रवेशाविषयी माध्यमांशी संवाद साधताना ॲड. क्षितिज गायकवाड यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होत आहे. विकासाच्या या प्रवाहात उपेक्षित, वंचित, मागासवर्गीय समाजाला सामावून घेण्यासाठी मी त्यांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाज विशेषतः बौद्ध समाज अजूनही विकासापासून वंचित आहे. या समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात संपर्क यंत्रणा राबवून काम करणार आहे असे ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड यांनी सांगितले आहे.