बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार

0
94

पुणे, दि. ४
पुण्यातल्या बोपदेव घाट या भागात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं कारण देत या दोघांचं तिघांनी अपहरण केलं. त्यानंतर तरुणाला बांधून ठेवत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी नेमकं काय काय घडलं हा घटनाक्रम सांगितला आहे.

पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा काय म्हणाले?
रंजन कुमार शर्मा म्हणाले, गुरुवारी रात्री २१ वर्षीय मुलगी तिच्या मित्रासह पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरायला गेली होती. रात्री ११ च्या सुमारास ते तिथे गेले होते. तीन लोकांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. या घटनेची माहिती आपल्याला आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकूण १० पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण तीन मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेरच्या राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकला जातात. यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बांधून ठेवलं होतं. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलगी बाहेरच्या राज्यातील आहे. या तिघांचाही शोध सुरु आहे.

बोपदेव घाटात मुलगी जखमी अवस्थेत सापडली
बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली आहे. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २१ वर्षीय पीडित तरुणी सध्या रुग्णालयात दाखल आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत. बलात्कार करणाऱ्या तिन्ही आरोपीचा शोध कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखेकडून घेतला जातो आहे.

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबबात संतापजनक पोस्ट लिहली आहे. सोशल मीडिया एक्सवरती सुळेंनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, “अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.