बोपखेलकरांसाठी वर्षभराने खुला होणार पुल

0
407

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) नागरिक रस्ता वाहतुकीस अचानक बंद केल्याने बोपखेलच्या रहिवाशांना गेल्या सात वर्षांपासून तब्बल 15 किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. तेथील रहिवाशांसाठी करता बांधण्यात येत असलेला मुळा नदीवरील पुलाचे काम पुढील वर्षी एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर म्हणजे तब्बल आठ वर्षांनी बोपखेलवासीयांचा वनवास संपणार आहे.

सुरक्षेचे कारण पुढे करीत दापोडीतील सीएमईने 13 मे 2015 ला बोपखेल ते दापोडी हा परंपरागत नागरी मार्ग बंद केला. नागरिकांना नाईलास्तव दिघी, विश्रांतवाडी मार्ग पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. कामगार, विद्यार्थी व व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर 1 हजार 866 मीटर म्हणजे सुमारे 2 किलोमीटर अंतराचा पुल बांधत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा मिळविणे, काम सुरू करण्यास परवानगी आणि 502 झाड्यांचे पुर्नेरोपण आदी अडथळ्याची शर्यत पूर्ण करून पालिकेने काम सुरू केले आहे.

बोपखेलच्या बाजूने व नदी पात्रावरील पुलाचे 100 टक्के काम वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास विलंबाने परवानगी मिळाल्याने 2 ऑक्टोबर 2021 ला त्या बाजूने काम सुरू करण्यात आले. तेथील सी आकाराचा पुल सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आहे. 512 आर्मी बेस वर्कशॉप, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी तसेच, संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पुल जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारण्यात येत आहे. त्यावर 1.5 मीटर उंचीचे व्हीजन बॅरिकेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आजूबाजूचे काही दिसणार नाही.

पुलाचे काम टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. संरक्षण विभागाकडून काम सुरू करण्याची परवानीस विलंबाने मिळाल्याने ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुलासाठी 53 कोटींचा 53 लाख खर्च अपेक्षित आहे. तसेच, संरक्षण विभागाने सुचविलेल्या जोड रस्ते, अंतर्गत मार्ग, 800 मीटर लांबीचा रणगाडा रस्ता, पुलावर व्हीजन बॅरिकेटस, सुशोभीकरण आदीचा खर्च 21 कोटी इतका आहे. संरक्षण विभागाच्या जागेसाठी पालिकेने 25 कोटी 81 लाख राज्य शासनाकडे भरले आहेत. तसेच, 502 झाडांच्या बदल्यात 93 लाख जमा केले आहेत. पुल एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर तो वाहतुकीस खुला होणार आहे. त्यामुळे बोपखेलच्या नागरिकांना पिंपरी-चिंचवड व पुण्याकडे ये-जा करण्यासाठी हक्काचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

ट्रॅक, बसगाड्यांना पुलावर नो एन्ट्री

दुहेरी लेनचा 8 मीटर रूंदीचा हा पुल आहे. पुलावरून कंटेनर, ट्रॅक अशा अजवड वाहनांना बंदी आहे. तसेच बसही या पुलावरून धावू शकणार आहे. सायकल, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी मोटारी आदी वाहनांचा या मार्गाचा वापर करता येईल. संरक्षण विभागाच्या अटीमुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

सुमारे दोन किमीचा पुल!

बोपखेल व मुळा नदीवरील तब्बल 1 हजार 866 मीटर लांबीचा हा इंग्रजी ‘सी’ आकाराचा पुल आहे. मुळा नदी पात्रावर केवळ 196 मीटर लांबीचा पुल आहे. नदी पात्र, रेल्वे मार्ग, वन क्षेत्र, रस्ता व संरक्षण आस्थापनेंवरून पुल जातो. बोपखेलच्या बाजूने 60 मीटर व खडकीच्या बाजूने 250 मीटरचा जोडरस्ता आहे. रस्त्यांची रूंदी 8 मीटर आहे. दोन लेनचा मार्ग आहे. पुलावर पादचार्‍यांसाठी पदपथ नाही. पुलाचा खर्च 53 कोटी 53 लाख व जोडरस्ता, रणगाडा रस्ता, अंतर्गत रस्ते, पुलाच्या कठड्यावरी व्हिजन बॅरिकेटस लावणे आदींचा खर्च 21 कोटी आहे.