बोगस आर्मी ऑफिसरला पुणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाकडून अटक

0
330

 पुणे, दि.११ पीसीबी) – आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या बोगस आर्मी ऑफिसरला (कर्नल) मिलेट्री इन्टेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. संजय रघुनाथ सावंत (वय – 55 रा. बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पंजाब मधील पठाणकोट येथील अनेकांची फसवणूक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार असून पंजाब पोलीस त्याचा शोध घेत होते.

बोगस अधिकारी बनुन संजय सावंत याने पठाणकोट येथे आर्मी मध्ये नोकरीस लावतो असे सांगून अनेक उमेदवार आणि पालकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात सावंत हा पाहिजे आरोपी असल्याची माहिती आर्मी इंटेलिजन्सने गुन्हे शाखा युनिट चारला दिली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिट चार आणि मिलेट्री इंटेलिजन्स यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली होती.

आरोपी संजय सावंत याचा पत्ता आणि माहिती मिळत नसल्याने तो सापडत नव्हता. दरम्यान, युनिट चारच्या पथकाला संजय सावंत हा देहुरोड येथील डीओडी डेपो येथे लेबर म्हणून नोकरी करत होता अशी माहिती मिळाली. तसेच तो दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाला असून सध्या तो पिंपळे गुरव येथे राहत असून रिक्षा चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवस 150 ते 200 रिक्षांची तपासणी करुन आरोपीचा शोध घेतला.

युनिट चारचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी मंगळवारी (दि.9) पठाणकोट पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. पठाणकोट पोलिसांनी पथक पुण्यात आल्यानंतर स्थानिक आर्मी इंटेलिजन्सच्या व युनिटच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशी मध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पठाणकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.