थेरगाव, दि. २० (पीसीबी) – सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 19) पहाटे गुरुनानक नगर, थेरगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे.
सुनील कुवटे उर्फ रामराव कुयटे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय 42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजश्री बेदरे (वय 32, रा. गुरुनानक नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती भाऊसाहेब आणि आरोपी सुनील यांच्यात जागेचा व्यवहार झाला होता. जागा विक्री केल्यानंतर त्याचे पैसे सुनील याने भाऊसाहेब यांना दिले नव्हते. त्या कारणावरून भाऊसाहेब यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या सात वर्षीय मुलीचा दोरीना गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी राजश्री यांचे नातेवाईक मयत झाल्याने त्या रविवारी (दि. 17) मूळ गावी गेवराई, बीड येथे गेल्या होत्या. दरम्यान, त्यांचा 15 वर्षीय मुलगा, 7 वर्षीय मुलगी आणि पती भाऊसाहेब घरी होते. त्या मंगळवारी पहाटे पाच वाजता गावाहून घरी आल्या असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
भाऊसाहेब यांनी किचन मधील पंख्याला गळफास घेतला होता. तर मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. भाऊसाहेब यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यामध्ये जागेच्या व्यवहारातील पैसे सुनील उर्फ रामराव याने दिले नसल्याने आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












































