बेड, गाद्यांतून लपवल्या ६० कोटींच्या नोटा, मोजायला लागल्या दहा मशिन

0
103

आग्रा येथील ३ बूट व्यापाऱ्यांच्या घरांवर आयकर पथकाने छापे टाकले. एका व्यावसायिकाच्या घरातून ६० कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा बेड, गाद्या आणि कपाटात लपवून ठेवल्या होत्या. त्याचे चित्रही समोर आले. पलंगावर चलनी नोटांचे बंडल ठेवलेले दिसून येत आहे. जमिनीवर ठेवलेल्या पिशव्याही नोटांनी भरलेल्या आहेत. हरमिलाप ट्रेडर्सचे मालक रामनाथ डांग यांच्या घरावर ३० तासांपासून छापा टाकण्यात येत आहे. झडती घेतली असता त्यांच्या घरातील बेड आणि गाद्यांमध्ये नोटांची बंडले सापडली. मोठ्या प्रमाणात रोकड पाहून अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्यासाठी बँकेतून १० मशिन मागवल्या. शनिवारी (१८ मे) सायंकाळपासून ही कारवाई सुरूच आहे. रोख रकमेचा आकडा आणखी वाढू शकतो, असे मानले जात आहे. अजूनही नोटांची मोजणी सुरू असल्याचे आयकर विभागाने सांगितले.

करचुकवेगिरीबद्दल माहिती मिळाल्यानंतर,आयकर पथकांनी शनिवारी आग्रा येथील तीन व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या पथकांनी एकाच वेळी एमजी रोडच्या बीके शूजच्या मालकाच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले, धाकरणच्या मंशु फूटवेअर आणि हेंग की मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्सवर छापे टाकले. बीके शूज आणि मंशु फूटवेअरमध्ये आयकर पथकाला किती रोकड सापडली याची माहिती समोर आली नाही. मंशु फूटवेअर आणि बीके शूजचे मालक नातेवाईक आहेत. काही वर्षांतच दोघेही बाजारात मोठे नाव बनले. त्याचबरोबर जमिनीत मोठी गुंतवणूक आणि सोने खरेदीचीही माहिती व्यावसायिकांकडून मिळाली आहे. आग्रा येथील इनर रिंग रोडजवळ व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली आहे.

अधिकाऱ्यांनी तिन्ही चपलांच्या व्यापाऱ्यांकडील लॅपटॉप, संगणक आणि मोबाइल जप्त केले आहेत. त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. पावत्या आणि बिलांसह स्टॉक रजिस्टरच्या तपासणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका आस्थापनाच्या ऑपरेटरने त्याचा आयफोन अनलॉक केला नाही. आयटी टीमने कुलूप तोडण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे.

सोन्या-दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक गॅझेटही जप्त
प्राप्तिकर विभागाने कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. हरमिलाप ट्रेडर्सचे मालक रामनाथ डांग यांच्या जयपूर निवासस्थानातून या टीमला बेड, गाद्या, कपाट, शू बॉक्स, पिशव्या आणि भिंतींमध्ये भरलेले ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले होते. गोविंद नगर येथील रामनाथ डांग यांच्या घरीही ४० कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. ही रोकड मोजण्याचं काम रात्रभर सुरू होतं. करचुकवेगिरी केल्याचा आरोप बीके शूज आणि मंशु फूटवेअरने करचुकवेगिरी केल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती सूत्रांनी दिली.वृत्तसंंस्था

रात्रभर नोटा मोजून अधिकारी थकले
हरमिलाप ट्रेडर्सचे मालक रामनाथ डांग याचे प्रभुनगर भागातील जयपूर हाऊसमध्ये घर आहे. तो कृत्रिम चामड्याचा व्यवसाय करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या घरातून नोटांची रास सापडली आहे. ५०० रुपयांच्या नोटांचे बंडलांनी कपाट, बेड आणि गाद्या भरल्या होत्या. नोटा मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. रात्री विश्रांतीसाठी संघाने बाहेरून गाद्या आणल्या. आग्रा, कानपूर, लखनऊ येथील ३० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या तिन्ही व्यावसायिकांच्या ६ ठिकाणी तपास करत आहेत. आग्रा व्यतिरिक्त कानपूर आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनाही प्राप्तिकर पथकात सामील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे