बेकायदेशीर फटाका स्टॉलवर महापालिकेची नजर!

0
192

पिंपरी दि. १३ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातून फटाका स्टॉलसाठी आत्तापर्यंत केवळ 15 जणांनी परवानगी घेतली आहे. बेकायदेशीर फटका स्टॉलवर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.महापालिकेची परवानगी घेऊनच फटका स्टॉल उभारावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने फटाके विक्रेत्यांना करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे.  राज्य सरकारने सण, उत्सवावरील सर्व निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर आता नागरिकांना दिवाळी या सर्वात मोठ्या सणाची उत्सुकता लागली आहे.  22 ऑक्‍टोबरपासून दिवाळीला सुरूवात होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या विविध भागात फटाके स्टॉल उभारले जातात. या फटाका स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी देण्यात येत आहे.

 स्टॉल उभारताना आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी. फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये. स्टॉल परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवू नये. फटाका स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे. 1 ते 5 हजार लिटर पाण्याची व्यवस्था ठेवावी. महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. सोमवारअखेर पिंपरी, चिखली, वाकड, चिंचवड आणि पिंपळे गुरव परिसरात फटाका स्टॉल उभारण्यासाठी 15 जणांनी अर्ज केले होते. त्यांना अग्निशामक विभागाने परवानगी दिली आहे. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात बेकायदेशीर फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करावी, असे पत्र अग्निशामक विभागाकडून देण्यात येणार आहे.

अग्निशामक विभागाने 1 हजार रूपये परवानगी शुल्क आकारून 15 फटाका स्टॉलधारकांना परवानगी दिली आहे. क्षेत्रीय कार्यालयांपैकी फक्त ह क्षेत्रीय कार्यालयाकडे 1 अर्ज आला आहे. तर प्रभागाने फक्त पाच मोठ्या स्टॉलला परवानगी द्यावी. व्यावसायिकांनी फटका स्टॉल उभारण्यापूर्वी महापालिकेची रितसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे फायरमन शहाजी चंदनशिवे यांनी सांगितले.