बेकायदा गर्भपात करून स्त्री भ्रूण हत्येच्या घटनेची चौकशी करण्याचे निलम गोऱ्हे यांचे निर्देश

0
195

पिंपरी दि. ९ (पीसीबी) -पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका ३३ वर्षीय महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी सातारा येथे व त्यानंतर महाड येथे गर्भपात केल्याची घटना घडली. घटनेतील महिला गर्भपातानंतर तिच्या घरी आल्यानंतर तिला त्रास जाणवू लागल्याने महिलेस ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा महिलेचा बेकायदेशीर गर्भपात झाला असून अर्धवट गर्भपात झाल्याचे तपासणीत ससून मधील डॉक्टरांना आढळले.

त्यामुळे महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर महिलेची मेडिकल पार्श्वभूमी नोंदवत असताना महिलेस आधी दोन मुली आहेत अशी माहिती डॉक्टरांना मिळाली. यासंदर्भात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांना याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

म्हैसाळ जि सांगली येथील सन २०१७ च्या अवैधरित्या गर्भपाताच्या घटनेत तपासात अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. सदरील घटनेत दोन ते अडीच वर्ष तर तपास करण्यासाठी लागले होते. यामुळे या घटनेतून आरोपींना मोकाट सुटण्याच्या संदर्भामध्ये खंतही आणि संवेदनहीन वर्तनाला अधिक वाव मिळताना दिसत आहे. अशा घटनेत आरोपीला शिक्षा मिळत नसल्याने अशा गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे.

गर्भातच स्त्री भ्रूणहत्या सारख्या क्रूर घटना अजूनही समाजात घडत आहेत यावरून ‘गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र ( पीसीपीएनडीटी ) कायद्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही असेच या घटनेवरून निदर्शनास येते. यावरून बेकायदेशीररीत्या अतिशय असंवेदनशील पध्दतीने काम करणाऱ्या स्त्री भ्रूणहत्येस जबाबदार असणाऱ्या डॉक्टर व संबंधित इतर यंत्रणेवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे निदेश डॉ.गोऱ्हे यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

तसेच सदरील घटनेत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात यावेत. यात कुठले रॅकेट आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी. पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य यंत्रणेला वारंवार सूचना देणे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी ,शाळा यामार्फत समाजात वारंवार जाणीव जागृतीसाठी सूचना देण्यात याव्यात असे निदेश डॉ.गोऱ्हे सदरील पत्राच्या माध्यमातून प्रशासनास दिले आहेत.