बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात – संजय राऊत

0
186

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असंही विधान केलं जाऊ शकतं अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना भवन, सामना, मातोश्री डोक्यात असेल तर यांचे मेंदू तपासा असंही ते म्हणाले. दरम्यान, शिंदेगट हे शिवसेनाभवनावर कोणताही दावा करणार नाहीत, असेही समजले.

“महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५० आमदारांच्या घरानंतर आता खासदारांनाही सुरक्षा दिली आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणांचा, पैशांचा वापर होत आहे, ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, पण आम्ही जे होईल ते पाहून घेऊ. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी, लढा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे,” असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

“मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर ही त्यांची नेहमीची भेट आहे, कारण ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड येथे आहे त्यामुळे त्यांना दिल्लीत यावं लागेलं. मंत्रिमंडळ तयार करायचं आहे, मंत्र्यांची यादी करायची आहे. पण मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना कधी मंत्रिमंडळाची यादी किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचं कधी ऐकलं नाही. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या. प्रत्येक राज्य आपल्या समस्या घेऊन दिल्लीत येत असतं, त्यासंबंधी टीका करणार नाही. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वरुन करुन त्यांच्याकडे पाहणार,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

“चिन्हाची, पक्षाची कोणताही लढाई असली तरी दोन हात करण्यास आम्ही समर्थ आहोत. सध्या छुपे वार सुरु आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं आता भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. यासाठी त्यांना शिवसेनेचे तीन तुकडे करायचे आहेत. अखंड शिवसेना फोडा, ताकद कमी करा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण शिवसेनेच्या चिन्हावर, ताकदीवर निवडून आलेले आमदार, खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असतील तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहील आणि आज ज्यांच्या घराबाहेर पहारे आहेत त्यांना परत कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु,” असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

“उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली असून आमच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसणार नाही. याउलट जे सोडून चालले आहेत त्यांचे चेहरे पहा,” असं संजय राऊत म्हणाले. संजय जाधव शिवसेनेसोबत असून बंडखोरांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्यांमुळे ते अस्वस्थ आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक असल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

“ज्यांची नावं पाहतोय त्या प्रत्येकाला उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय संकटातून सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले हे त्यांनाही माहिती आहे. त्यांची समाजात बेआब्रू, बेइज्जती होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी किी प्रयत्न केले हेदेखील त्यांना माहिती आहे. तरीही निघाले असतील तर त्यांचा निर्णय त्यांना लखलाभ असो. आम्ही सर्वजण बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहोत,” असं प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं.

भाजपा नेते उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीचे फोटो व्हायरल करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “उद्धव ठाकरे सरकार स्थापन करण्यासाठी आले नव्हते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून भेटायला आले होते. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही ते भेटले होते. सर्व प्रमुख नेत्यांची भेट त्यांनी घेतली होती. त्यांचे फोटो का व्हायरल करत नाहीत?”.

“बाळासाहेबांची शिवेसना इतक्या सहजपणे हार आणि शरण जाणार नाही हे माहिती असल्यामुळे लोकांना भ्रमिक करण्यासाठी अशी वक्तव्यं केली जात आहेत. उद्यापासून सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा फैसला कऱणारी सुनावणी होणार आहे. त्याच अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. काही प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आजही सुप्रीम कोर्टात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, राष्ट्रसेवा होईल याची खात्री आहे,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात पुराची गंभीर स्थिती असून लोकांचे मृत्यू होत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री येथे राजकारण करण्यासाठी, सरकार वाचवण्यासाठी आले आहेत. निवडणूक आयोगाकडे जातील, शिवसेना खासदारांना फोडण्यासाठी भेटतील,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

“आम्ही ही संकटं पहिल्यांदा पाहिलेली नाहीत. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक असतील…पक्षाने मोठं करायचं, ताकद द्यायची आणि नंतर आपला गट घेऊन बाहेर पडायचं हे सगळीकडे होत आहे. एकाच पक्षात होत नाही. राजकारणात आता नितिमत्ता, निष्ठा, वैचारिक बंधनं राहिलेली नाहीत. फुटीरांना प्रोत्साहन देणारं नेतृत्व देशाच्या राजधानीत असेल तर असं घडणारच. श्यामप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी बोलता आणि दुसरीकडे बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्याचं पाप करता. आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण उद्या हे पाप स्वस्थ बसू देणार नाही,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.