बॅनर झळकावत शरद पवारांना बारामतीकरांचा फुल्ल सपोर्ट

0
54

बारामती, दि. १८ : प्रचाराच्या अंतिम दिवशी बारामतीमध्ये शरद पवारांच्या छायाचित्रांचे वेगवेगळे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. बारामतीतील मोरगाव रोड येथील लेंडी पट्टी परिसरात शरद पवारांची प्रचाराची अंतिम सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या प्रचाराच्या अंतिम सभेत युवकांपासून जेष्ठांपर्यंत अनेकांनी हातात धरलेले फलक चर्चेचा विषय ठरले.
बारामतीत बापमाणूस…
साहेबांचा आदेश आलाय…
गद्दारांना पाडा…
बारामती साहेबांची होती आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार!
महाराष्ट्रात यंदा तुतारीच वाजणार आणि त्याची सुरुवात बारामतीतून होणार!
जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय!
या एका बोटावर महाराष्ट्राचं राजकारण चालतंय!
गद्दारांना शिक्षा द्यायची असते, कराल काय नाद परत?
साहेब आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहतोय!
पावसातला सह्याद्री … असे विविध फलक हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच या लढाईला समाजाच्या सर्व स्तरातील घटक बरोबर आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, बारामतीत शरद पवारांवर प्रेम करणारे लोक पूर्वी होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. बारामतीतील निवडणूक लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये हाय होल्टेज अशा स्वरूपाची झाली आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.

दरम्यान, मागील वर्षी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादीतील अनेकांनी अजितदादांना समर्थन दिलं. अशात शरद पवारांसोबत अगदी काहीच कार्यकर्ते राहिले. अशात आता बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण राज्यभरात आहे. मात्र सोमवारी बारामतीकरांनी शरद पवारांप्रती प्रेम व्यक्त करत बारामती साहेबांची होती आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार असं म्हणत त्यांना फुल्ल सपोर्ट केला आहे.