चाकण, दि. १९ (पीसीबी)
बॅनरची फ्रेम नेल्याच्या संशयावरून एकाने 17 वर्षीय मुलाला हातातील कडे, दांडके आणि दगडाने बेदम मारहाण केली. मुलाचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री चाकण येथे घडली.
आलोक राजेश पारवे (वय 17, रा. महात्मा फुले नगर, चाकण), सनी गालफाडे अशी जखमींची नावे आहेत. आलोक यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर राम जोगदंड (रा. महात्मा फुले नगर, चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आलोक हे महात्मा फुले नगर येथून जात होते. त्यांनी बॅनरची फ्रेम नेल्याचा संशय आरोपीला होता. त्या कारणावरून आरोपीने आलोक यांना अडवले. मी तुला बोलतो आहे आणि तू पुढे चालला असे म्हणत त्यांची कॉलर पकडली. आलोक यांनी आरोपीला बाजूला ढकलले. त्या कारणावरून आरोपीने दमदाटी करत आलोक यांना हातातील कडे, दांडक्याने मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी आलोक यांचा मित्र सनी आला. त्याला देखील आरोपीने मारहाण केली. आरोपीने मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ दमदाटी केली. दगडाने मारून फिर्यादीला जखमी केले. या दहशतीला घाबरून आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली. नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.













































