बुधवारी पिंपरी-चिंचवडला असीम सरोदे यांच्याशी खुला संवादाचा कार्यक्रम

0
114


दिशा सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (२ ऑक्टोबर) ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी-प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात (छोटे सभागृह) हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सरोदे यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रह्मे हे संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राजकीय पक्षांची तोडफोड, निवडणूक चिन्हांचे दावे-प्रतिदावे, आमदारांची अपात्रता, न्यायालयीन तसेच विधिमंडळातील निवाडे ते थेट बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा पोलिसांनी नुकताच केलेला एन्काऊंटर ! या सगळ्या प्रकरणांमध्ये संविधानाची पायमल्ली केली जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. संविधानिक नैतिकता पायदळी तुडवण्यात येत असल्याच्या विविध घटनांचे अन्वयार्थ लावत, परखड विश्लेषण करणारे ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्याशी थेट संवादाचा हा कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तथापि, मर्यादित आसनक्षमतेमुळे प्रथम येईल, त्यास प्राधान्य या न्यायाने प्रवेश दिला जाणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.