पिंपरी, दि. ७ – जैन समाजाची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बुधवारी ९ एप्रिल रोजी भारतासह इतर १०८ देशांमध्ये “विश्व नवकार महामंत्र दिवस” साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना पाहता यावे व या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी चिंचवड गावातील श्री फत्तेचंद विद्यालय येथे जीतो चिंचवड पिंपरी चॅप्टर फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती झोन चेअरमन राजेंद्र जैन यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
बुधवारी सकाळी सात वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता साधू आणि साध्वीजी मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ वाजता ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेऊन मार्गदर्शन करतील याचे प्रक्षेपण १०८ देशात, सहा हजार पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी करण्यात येणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आजी माजी लोकप्रतिनिधी आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जीतो चिंचवड पिंपरी चॅप्टरचे प्रमुख मार्गदर्शन करतील अशी माहिती जीतोचे चिंचवड पिंपरी अध्यक्ष आनंद मुथा, महिला विभाग अध्यक्ष पूनम बंब, युवा विभाग अध्यक्ष सौरभ बेदमुथा, मुख्य सचिव तुषार लूणावत, मीना ताटीया, अनुज चोपडा यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
धर्म, जात, पंथ यांच्या सीमा ओलांडून भारतासह १०८ देशांमधील नागरिक विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी विश्व नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करणार आहेत.