– तब्बल ९६२९ कोटींच्या खजिन्याच्या चाव्या ताब्यात
मुंबई, दि. १८ (पीसीबी) – सध्या बीसीसीआयमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपला असून बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली आहे. तर भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. खजिनदार म्हणून शेलार यांची निवड करण्यात आली आहे. ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आता शेलार यांच्याकडे असणार आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिजोरीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत दिले आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. आशिष शेलार हे जून २०१५मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहे. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.