भोसरी, दि. 11 (पीसीबी) – बनावट कागदपत्रांच्या आधारे बीव्हीजी डेव्हलपर्स यांच्या खात्यातून दहा कोटी 14 लाख 18 हजार रुपये परस्पर काढले. त्यातील एका आरोपीने तीन कोटी 20 लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित आरोपींनी सहा कोटी 94 लाख 18 हजारांची फसवणूक केली. ही घटना 25 ऑक्टोबर 2019 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया औद्योगिक वित्त शाखा, वल्लभनगर येथे घडली.
बिभिषण व्यंकटराव गायकवाड (वय 53, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाहबाज जफर सययद मोहमंद जफर (रा. लोढा सोसायटी, गहुंजे), विजय अरविंद रायकर (वय 46, रा. सिंहगड रोड, पुणे), गौरव सुनील सोमाणी (वय 35, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि महेश भगवानराव नलावडे (पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज आणि वियज रायकर हे दोघेजण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिलेशनशिप मॅनेजर या पदावर आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी संगणमत केले. बीव्हीजी डेव्हलपर्स नावचे बनावट विनंतीपत्र तयार करून त्यावर फिर्यादी व त्यांच्या भावाच्या बनावट स्वाक्षरी केल्या. त्याद्वारे बीव्हीजी डेव्हलपर्सच्या भागीदारी संस्थेचे मंजूर मुदतकर्ज खात्यातून वेळोवेळी 10 कोटी 14 लाख 18 हजार रुपये फिर्यादी यांच्या संमतीशिवाय काढून घेत वेगवेगळ्या फर्मच्या खात्यावर वळते केले.
तसेच आरोपींनी आपला उद्देश सफल व्हावा यासाठी बनावट बँक स्टेटमेंट तयार करून त्यावर बँकेचा शिक्का मारून तो फिर्यादी यांना पाठविले. हा गैरप्रकार उघडकीस येताच आरोपी विजय रायकर याने तीन कोटी 20 लाखांची रोकड परत केली. उर्वरित सहा कोटी 94 लाख 18 हजारांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.











































