“बीपी, शुगर कमी झालेलं, अशक्तपणाही खूप…” मनोज जरांगेच्या तब्येतीवर डॉक्टर म्हणतात…

0
620

महाराष्ट्र,दि.०४(पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी सुरु केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी थांबवलं. दोन महिन्यात मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर जरांगेंनी हा निर्णय घेतला. गेल्या 9 दिवसांपासून मनोज जरांगे हे अन्नाशिवाय उपोषण करत होते. मध्ये काही दिवस त्यांनी पाणीही घेतलं नव्हतं. याचे परिणाम त्याच्या शरीरावर झाले आहेत. याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिलीये.

25 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी गावात पुन्हा उपोषण सुरू केले होते. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता. मात्र, नंतर जरांगेंची प्रकृती ढासळल्यानंतर आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या. आंदोलकांना शांत करण्यासाठी जरांगे पाटलांनी घेतलं होतं. त्याचबरोबर इतर नेत्यांनी भेट घेतली तेव्हाही ते पाणी प्यायले होते. मात्र, पुरेसं अन्न आणि पाणी न घेतल्याने त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीवर काय झाला परिणाम?
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. त्यांची प्रकृती चांगली नसल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येत असून, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीतबद्दल माहिती दिली. डॉक्टर म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांची तब्येत चिंताजनक होती. 2 नोव्हेंबर रोजी भरती झाले, तेव्हा त्यांचा बीपी, शुगर कमी झालेलं होतं. अशक्तपणाही खूप होता. त्यांच्या रक्त चाचण्या आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये असे आढळून आले की, त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आहे.” “नऊ दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या किडनी आणि लिव्हरला इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला त्यांची प्रकृती प्रतिसाद देत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला अजून पाच ते सहा दिवस लागतील”, अशी माहिती डॉक्टरांनी जरांगेंच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले.