बीड शहरात मुंडे गँगचा धुमाकूळ, मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

0
2

दि . १७ ( पीसीबी ) – संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे कुख्यात झालेला बीड जिल्हा शुक्रवारी आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे हादरला. बीडच्या परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण करतानाचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला जोरात बडवताना दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे याचे अपहरण‌ करण्यात आले होते. शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली. दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओदेखील चित्रीत केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून पुढे काय पाऊल उचलले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बीड जिल्हा प्रशासनाने ड्रोन उडविण्यावर निर्बंध आणले आहेत. 3 जूनपर्यंत हा मनाई आदेश लागू असणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात ड्रोन तसेच मानव रहित यंत्र उडविण्यावर पूर्णपणे निर्बंध असणार आहे. दरम्यान याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा प्रशासनाने दिला आहे.

परळीमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या विरोधात संभाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. अमोल कांदे पांडुरंग शेंडगे सतीश मुंडे व मनोहर मुंडे अशी चार आरोपींची नावे असून हे चौघेजण रेल्वे स्टेशन परिसरात गावठी कट्टा सह आढळून आले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमोल कांदे पांडुरंग शेंडगे या दोघांना अटक केली असून सतीश मुंडे,मनोहर मुंडे यांचा शोध परळी संभाजीनगर पोलीस घेत आहेत.