- उध्दव ठाकरे भेटणार संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला
बीड, दि. २8(पीसीबी)
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे.
बीडमध्ये आज होणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या मूक मोर्चा निमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे. सध्या बीडमधील मूक मोर्चाच्या निमित्ताने सकाळपासून सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आले आहेत. बीडमधील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बीडमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारी सर्व वाहतूक वळवण्यात आली आहे.
बीडमधील मूक मोर्चासाठी 400 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात 4 डीवायएसपी, एक अपर पोलीस अधीक्षक देखरेखीला असणार आहेत. त्यासोबतच राज्य सुरक्षा बलाच्या दोन तुकड्यादेखील तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आरपीएफ तैनात करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड शहरात सर्व पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक शिवाजी महाराज पुतळा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे या मोर्चाचे स्वरुप असणार आहे. या मोर्चात अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मोर्चात छत्रपती संभाजी राजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके, मनोज जरांगे सहभागी होणार आहेत. अंजली दमानिया या देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी हा मोर्चा निघणारआहे.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी अनेक नेते आज मोर्चाला हजेरी लावणार आहेत. या नेत्यांची नावे समोर आली आहेत. यातील बहुतांश नेते हे बीडसाठी रवाना झाले आहेत. खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे भोसले हे नेते या मोर्चाला उपस्थिती असणार आहेत.