बीड लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी निश्चित

0
224

बीड, दि. १५ (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मित्रपक्षांचे जिल्हास्तरीय संमेलनाची सुरुवातच रविवारी (ता. १४) नाराजीचे झाली. व्यासपीठावरील बॅनरवर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे छायाचित्र नसल्याने समर्थक संतप्त झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपातळीवरुनच बॅनरचे डिझाईन निश्चीत झाल्याचे सांगून समजूत काढली. त्यानंतर मुख्य बॅनरच्या बाजूला दिवंगत मुंडेंचा डिजिटल फोटो लावण्यात आला.

भाजपसह महायुतीतल्या मित्रपक्षांनी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडेच असतील, यावर शिक्कामोर्तब केले आणि हॅटट्रिकचाच विश्वासही व्यक्त केला. तर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह भाजप आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांतील नेते व पदाधिकाऱ्यांत सुसंवाद असावा, यादृष्टीने रविवारी (ता. १४) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा झाला.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सोळंके, मेळाव्याचे समन्वयक अमरसिंह पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, सुरेश नवले, भीमराव धोंडे, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, रमेश आडसकर, संजय दौंड, आर. टी. देशमुख, अनिल जगताप, राजेश्वर चव्हाण, कल्याण आखाडे, विजयसिंह पंडित, कुंडलिक खांडे, राजेंद्र मस्के, सचिन मुळूक, नारायण काशीद, अनिल तुरुकमारे, अशोक डक, सलीम जहांगीर, डॉ. योगेश क्षीरसागर, बबन गवते, मोहन जगताप, नारायण शिंदे, शिवाजी सिरसट, अविनाश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, सुरुवातीलाच बॅनरवर दिवंगत मुंडेंचा फोटो नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व संताप व्यक्त केला. मुळ बॅनरवर मग दिवंगत मुंडेंचा फोटो असल्याचे बॅनर लावण्यात आले. मात्र, सदर बॅनरचे डिझाईन राज्य पातळीवरून आणि भाजप कार्यालयातूनच निश्चित झाल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगून समजूत काढली. त्यानंतर वर लावलेले बॅनर काढून मुळ बॅनरच्या बाजूला दिवंगत मुंडेंचा डिजिटल फोटो लावण्यात आला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही आपल्या भाषणात हा मुद्दा अधोरेखित केला.

महायुतीचे संमेलन म्हणजे भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडेंच्या लोकसभा तयारीची पहिली पायरी होती. मात्र, या संमेलनाला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह आमदारांची अनुपस्थिती होती. बॅनरवर पंकजा मुंडेंचा ठळक फोटो होता. तरीही त्यांच्यासह भाजपचे लक्ष्मण पवार, नमिता मुदंडा व सुरेश धस हे तिघेही आमदार अनुपस्थित होते.

डॉ. प्रीतम मुंडेच लोकसभेला महायुतीच्या उमेदवार असतील आणि त्या हॅट्‌ट्रीक करतील, असा विश्वासही या मेळाव्यात भाजपसह मित्रपक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला. सर्व नेत्यांच्या सकारात्मकतेबद्दल डॉ. मुंडेंनी आभार मानले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. प्रीतम मुंडे उमेदवार असतील आणि देशात सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.