शक्ती कायदा लवकर प्रत्यक्षात यावा
पुणे दि.२१(पीसीबी): बीड जिल्ह्यातील एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग करण्यात आले आहे. या पीडित महिलेला तात्काळ मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत दिली जावी. तसेच अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी शक्ती कायदा लवकर प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
बीडमध्ये एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ करून महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला असून या घटनेची गांभीर्याने दखल घेत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील विधवा महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग करून सातत्याने सामूहिक बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. एकल महिलांना कुटुंबातून मदत होत नाही तसेच त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अशा स्त्रिया बऱ्याचदा यासारख्या घटनेचे बळी ठरल्याचे दिसतात. यातील आरोपीने दलालासारखे वर्तन केले असून पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या सर्व घटनेसंदर्भात तात्काळ कारवाई होण्यासाठी उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र यांच्यावतीने पोलिसांना संपर्क केला असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.
पीडित महिलेला तात्काळ मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत दिली जावी. तसेच अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी शक्य तितक्या लवकर शक्ती कायदा प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. याच्या अंमलबजावणी करिता मानक कार्यपद्धती (SOP), समाजाचा सहभाग, सामान्य कार्यकर्त्यांना महत्व या गोष्टी झाल्याशिवाय लोकांना आधार मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.










































