बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचे पडसाद थेट लोकसभेत; खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत उठवला आवाज

0
27

मुंबई, दि. 16 (पीसीबी) : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आता देशपातळीवर उमटू लागले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हे प्रकरण संसदेत उपस्थित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी लोकसभेत या विषयावर लक्ष वेधले. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. ही हत्या जातीयवादातून केली गेल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहे. ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्याचवेळी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणात एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे.

राज्यानंतर दिल्लीत या प्रकरणाचे पडसाद उमटले. खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत बोलताना सोमवारी म्हटले की, बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. माझ्या मतदारसंघातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, असे खासदार सोनवणे यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांचीसुद्धा भेट घेतली होती.

सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले आहे. दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे. दरम्यान सोमवारी आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. संतोष देशमुख हत्येला सात दिवस पूर्ण होतात. विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे.