चऱ्होली, दि. २२ (पीसीबी) – च-होली फाटा येथील बस स्टॉपवरील अॅल्यूमिनियमचे दरवाजे आणि अॅल्यूमिनियमच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री एक ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली.
बीआरटी बसस्टॉप वरील सुरक्षा रक्षक स्वप्नील तापकीर (वय 30, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चऱ्होली फाटा येथील बीआरटी बस स्टॉपवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री एक वाजता त्यांच्या पत्नीची तब्बेत अचानक बिघडली असल्याने ते कामावरून अचानक घरी गेले. दरम्यान बस स्टॉपवर सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून आरोपींनी तिथून 20 हजारांचे अॅल्युमिनियमचे फ्रेम आणि 10 हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या पट्ट्या चोरून नेल्या. दिघी पोलीस तपास करीत आहेत.












































