बिल्डर रविंद्र सांकला यांची अडिच कोटींची फसवणूक

0
192
187143521

पुणे ,दि.१२(पीसीबी) – व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी मुंबईच्या प्रसिद्ध व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२१ ते आजवर ढोले पाटील रस्त्यावरील रविराज रिअॅलिटी मिलेनियम याठिकाणी घडला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमतीप्रसाद मिश्रीलाल बाफना (वय ६२, रा. गोविंद महल, मरीन ड्राईव्ह, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. बाफना याचा मुंबईमध्ये बाफना मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने व्यवसाय आहे. याप्रकरणी रविंद्र नौपतलाल सांकला (वय ६२, रा. अॅलेक्सझेंड्रा रोड, सोपानबाग, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकला यांचा रविराज रिअॅलिटी नावाने बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे कार्यालय ढोले पाटील रस्त्यावर आहे. सुमतीप्रसाद बाफना हे देखील व्यावसायिक असल्याने त्या दोघांची ओळख होती. बाफना याने साकला यांची २६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. त्याने ते बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लि. चे संचालक असल्याचे सांगितले होते. त्याने कंपनीकरीता व रीयल इस्टेटकरिता तीन कोटी पाच लाख रुपयांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले होते. ही रक्कम जर सांकला यांनी बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लिमिटडमध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यत गुंतवली तर भरपुर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. अथवा गुंतवणुकीच्या रकमेच्या चौपट जागा देऊ असे आश्वासन, अभिवचन व हमी दिली होती. सांकला यांनी बाफनाकडे लेखी करार अथवा वचनपत्र बनवण्याची विनंती केली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे.

फिर्यादीनुसार, त्यावर त्याने ‘त्याची गरज नाही, माझे नाव मोठे आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही’ अशा भुलथापा दिल्या. या वेळी साकला यांचे सीए अमोल लाहोटी आणि शशीकांत उबाळे हे उपस्थित होते. बाफना याच्या आश्वासनावर व हमीवर विश्वास ठेवत त्यांनी गुंतवणुक करण्याची तयारी दर्शवली. गुंतवणुक केल्याने चांगला नफा होईल, अशी त्यांची आशा होती. बाफना याने अन्य ओळखीच्या गुंतवणुकदारांना त्यांच्याकडे रक्कम गुंतवायला सांगावे अशी विनंती देखील केली होती. त्याप्रमाणे साकला यांनी ३१ मार्च २०२१ रोजी वैयक्तिक बचत खात्यामधून २ कोटी ६० लाख रुपये बाफनाने सांगितल्या प्रमाणे बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लिमिटेडच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या नरिमन पॉईंट शाखेमधील खात्यावर वर्ग केले. तसेच, ४५ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

ही रक्कम बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लिमिटेडमध्ये गुंतविल्यानंतर बाफना याची त्यांनी फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाट पाहिली. त्यानंतर त्यांना गुंतवलेली रक्कम ठरल्याप्रमाणे परत मिळवण्यासाठी विचारणा केली. त्यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सांकला यांना तो हेतुतः भेटायचे टाळत होता. त्याला वारंवार फोनद्वारे संपर्क केला असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यामुळे ०१ मार्च २०२३ रोजी सांकला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रारी अर्ज केला. त्याअनुषंगाने ०९ मे २०२३ रोजी बाफना यांने अटकेच्या भितीने पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. अटकपूर्व जामीन मंजुर होण्याकरीता बाफनाने सांकला यांना ४ मे २०२३ रोजी २० लाख आणि ०८ मे २०२३ रोजी २० लाख, १६ मे रोजी १० लाख आणि २६ जून रोजी ५ लाख असे एकुण ५५ लाख रुपये परत केले. उर्वरीत रक्कम लवकरात लवकर परत करेन, असे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने बाफना याचा अटकपूर्व जामीन जामीन अर्ज मंजुर केला. परंतु, अटक पुर्व जामिन मिळाल्यानंतर बाफना याच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही आजपर्यंत सांकला यांचे उर्वरित २ कोटी ५० लाख रुपये परत केलेले नसल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.