रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची शिक्षा माफ करुन त्यांना मोकाट सोडले आहे. ही बाब अतिशय घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी आहे. अशांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले. या प्रकरणातील अकरा आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव देण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही आल्हाट यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची शनिवारी भेट घेतली. यावेळी महिला शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले .
निवेदनात म्हटले आहे की,
२००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचार झाला. या प्रकरणी दोषी ठरलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या ११ गुन्हेगारांना गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी माफी करुन सोडले. त्यामुळे बिल्कीसच्या कुटूंबावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या महोत्सवा प्रसंगी देशाला उद्देशून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नारी का सन्मान करना चाहिये, असे लाल किल्ल्यावरुन संबोधन केले. त्याच दिवशी त्यांच्या राज्यात आरोपीची शिक्षा माफ करुन त्यांना मोकाट सोडले आहे. ही बाब अतिशय घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी आहे. अशांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे सोडलेल्या आरोपींना तात्काळ अटक करुन पुन्हा जेलमध्ये पाठवा, बिल्कीस व त्यांच्या कुटूंबियांना संरक्षण द्यावे यासह इतर मागण्याही आल्हाट यांनी केल्या आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एकीकडे आपण नारीशक्तीच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे मात्र या नराधमांना शिक्षेतून सूट देतो, मुक्त करतो. हा स्वातंत्र्याला काळीमा फासणारा निर्णय म्हणजे एकट्या बिल्कीस बानो यांना नाही तर अखंड भारतातल्या स्त्रियांना डागण्या देणारा आहे.