बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचे स्वागत करणे चुकीचे, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

0
235

मुंबई,दि.२४(पीसीबी) – बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणे चुकीचे असल्याचे परखड मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत व्यक्त केले.

बिल्किस बानोवरील बलात्कार प्रकरणी ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांनी १४ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर गुजरात सरकारने उर्वरित शिक्षा माफ करून त्यांची १५ ऑगस्टला तुरुंगातून सुटका केली़ त्यानंतर त्यांचा सत्कार करून मिठाई वाटण्यात आली होती. त्यावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या़

भंडारा-गोंदियात एका महिलेवर दोनदा बलात्कार करण्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणासह महिला अत्याचारांच्या घटनांवर विधान परिषदेत चर्चा झाली. त्यात बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या सत्काराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘‘या गुन्हेगारांनी १४ वर्षे शिक्षा भोगली होती. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेतला आणि या गुन्हेगारांची सुटका झाली. पण, गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. त्यांच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. ते करणे चुकीचे आहे.’’