बिलकूल नाराज वगैरे नाही, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा खुलासा – मी वॉशरूमला सुद्धा जायचं नाही का ?

0
266

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सरकारी कर्मचाऱ्यांना परिपत्रक काढून बोलावण्यात आल्यावरुन त्यांनी टीका केली. त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सर्व अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका यांना खुशाल बैठकीसाठी बोलावलं आहे. असं राज्यांत कधी झालं नव्हतं. परिपत्रक काढून त्यांना बोलावण्यात आलं आहे. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी या महिला सभेला आल्या तर मग लहान मुलांचं काय? त्यांना कोण सांभाळणार? आता मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली असेल तर अवघड आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री नेमले नाहीत. सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की नवीन पालकमंत्री आल्यानंतर डीपीडीसी बाबत निर्णय घेतील. आता जर निधी खर्च झाला नाही तर पैसे लॅप्स होतील. कदाचित त्यांची अडचण असेल की एका जिल्ह्यात दोन तीन इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हा प्रश्न असेल, असंही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलणं का टाळलं?
अजित पवार यांनी म्हटलं की, पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात अध्यक्षांनी आगामी रणनितीबाबत माहिती दिली. मी काल बोलणं टाळलं. माध्यमांनी काल चुकीचा अर्थ काढला. मी एकटाच नाही तर सुनील तटकरे, वंदना चव्हाण, वेळेअभावी बोलू शकले नाहीत. मी मराठी माध्यमांना कालच नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली. मी वॉशरूमला सुद्धा जायचं नाही का? असा सवाल त्यांनी केला. मी केंद्रात मार्गदर्शन करत नाही राज्यांत मी बोलत असतो. त्यामुळे गैरसमज दूर करावा, असं अजित पवार म्हणाले.

लम्पी आजार वाढतोय, सरकारनं उपाययोजना करावी
अजित पवार म्हणाले की, देशपातळीवर पंजाब, हरियाणा, राजस्थान लम्पी स्किन आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाला अडचण निर्माण झाली आहे. जर वेळीच लसीकरण नाही झालं तर मात्र आजार वाढतो. मी पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबात बोललो आहे. या आजाराबाबत समज गैरसमज आहेत. याबाबत सरकारने जनजागृती करावी. म्हशीला हा आजार होत नाही. राज्य सरकारने याबाबत तत्काळ पाऊले उचलावीत. जर जनावरं दगावली तर मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होईल, असंही अजित पवार म्हणाले.

मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे. त्या खात्याच्या मंत्र्यांनी प्रेस घेऊन मार्गदर्शन करावं. संकरित गाईमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, असं ते म्हणाले. 16 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाने कधी सुरु करायचे याबाबत बैठक आहे. 1 ऑक्टोबरला कदाचित कारखाने सुरू होतील. यावेळी अनेक जनावरे येतील परिणामी आजार वाढेल, असंही अजित पवार म्हणाले.परदेशातून लशी मागवा. जनावरांना आजार होणारं नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असंही अजित पवार म्हणाले.