“बिबट्याचा थरार; वृद्ध महिलेला झोपेतून फरपटत नेलं – शिरूर हादरलं”

0
3

दि . २५ ( पीसीबी ) शिरूर : गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक गावात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून आलेला आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव परिसरात बिबट्याने एका 95 वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला केला आहे. साखर झोपेत असताना अचानक दबक्या पावलांनी बिबट्या आला आणि त्या वृद्ध महिलेला फरपटत घेऊन गेला. यातच त्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई भोईटे असे मृत महिलेचे नाव आहे. वाढत्या उन्हाच्या तडाक्यामुळे त्या घरासमोरच्या ओट्यावर झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास बिबट्याने त्यांना ओट्यावरून फडपटत नेत उसाच्या शेतात ठार केलं. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी उशिरापर्यंत त्या दिसल्या नाहीत म्हणून कुटुंबीयानी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. या शोधादरम्यान उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.यावर बिबट्यांच्या हल्ल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

या घटनेनंतर इनामगाव आणि आसपासच्या परिसरातील नागरिक बिबट्याच्या हल्ल्यामुळे भयभीत झाले असून संतप्त गावकऱ्यांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.