बिनविरोधसाठी शिंदे, राज ठाकरे, बावनकुळेंचा आटापीटा

0
453

-सात-आठ महिन्यांसाठी पोटनिवडणूक लढू नये : बावनकुळे

पुणे, दि. ५ (पीसीबी) – कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार, नाना पटोले यांना फोन केले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी इच्छा व्यक्त केली , तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे पत्र लिहून सर्व भाजप विरोधकांना आवाहन केले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुध्दा सात-आठ महिन्यांसाठी पोटनिवडणूक लढू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि बिनविरोधचे आवाहन केले आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांमधील आमदारांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अनेक चर्चा आणि बैठकांनंतर दोन अधिकृत उमेदवारांची शनिवारी (४ फेब्रुवारी) घोषणा केली. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप हे दोन भाजपचे उमेदवार असतील. दुसऱ्या बाजूला या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरू आहेत. दरम्यान, या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह राज्यातल्या सर्व पक्षांना विनंती केली आहे की, त्यांनी ही पोटनिवडणूक लढू नये. बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विनंती केली की, “राज्यातील पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा या नेत्यांनी जपावी.”
बावनकुळे म्हणाले की, “कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपाच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी अवधी बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या.”