‘बिग बॉस मराठी’मधून जान्हवी किल्लेकरला बाहेरचा रस्ता

0
141

मुंबई, दि. २४ : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला, पण सर्वाधिक चर्चा जान्हवी किल्लेकरची झाली. पॅडी कांबळे यांच्याबद्दल वापरलेल्या अपमानजनक शब्दांमुळे तिला या आठवड्यात चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. आता ‘भाऊच्या धक्क्या’वरही कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखने जान्हवीला तिची जागा दाखवली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कदरम्यान जान्हवी पॅडी यांना असे म्हणालेली की, “आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग केली आणि आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करतायत”. त्यानंतर दुसऱ्याच एपिसोडमध्ये तिने पॅडी यांची माफी मागितली, मात्र तिने प्रेक्षकांचा रोष ओढावला. जान्हवीची कानउघडणी करत चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंंडळींनी पॅडी यांना पाठिंबा दिला आणि त्यांची कारकीर्द नेमकी काय आहे, याची आठवण जान्हवीला करुन दिली. आता ‘भाऊच्या धक्क्या’वरही रितेशने जान्हवीची शाळा घेतली.

या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’चा प्रोमो समोर आला असून जान्हवीला रितेशने चांगलेच सुनावले. तो जान्हवीला ऐकवतो की ती नेहमी इतरांना सांगत असते की ती त्यांना बाहेर काढेल. त्यावरुन रितेशच तिला खडसावतो की, तोच आता तिला बाहेर काढणार आहे. रितेश म्हणतो की, ‘तुमचा माज, तुमची दादागिरी आज इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढतो… दरवाजा उघडा…’ प्रोमोमध्ये दिसते आहे की रितेशने आदेश दिल्यानंतर जान्हवी ओक्साबोक्शी रडू लागते. रितेशच्या आदेशावरुन तिथून निघूनही जाते.