हैदराबाद, दि.०६ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे 80 वर्षांचे असले तरी देखील आजही चित्रपटसृष्टीतल ते सक्रिय आहेत. अमिताभ यांनी आजवर अनेक चित्रपट केले आहेत. आजही ते चित्रपटांमध्ये स्वत: अॅक्शन सीन्स देतात. दरम्यान, नुकताच अमिताभ हे जखमी झाले आहेत. अमिताभ यांना ही गंभीर दुखापत झाल्याची ही बातमी अमिताभ यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. अमिताभ बच्चन हे त्यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ च्या शूटिंगसाठी हैदराबादला पोहोचले होते. त्यावेळी त्यांचे अॅक्शन सीन्स देताना त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. सध्या अमिताभ हे त्यांच्या घरी मुंबईत परतले आहे. या विषयी अमिताभ यांनी ब्लॉग शेअर करत याची माहिती दिली आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या अपघाता विषयी सांगत मोठा खुलासा केला आहे. ‘हैदराबादमध्ये मी ‘प्रोजेक्ट के’ चं चित्रीकरण करत होते. दरम्यान, चित्रपटात एक अॅक्शन सीन होता आणि तो सीन शूट करत असताना मला दुखापत झाली. माझ्या बरगड्यांना मार बसला आहे आणि त्यासोबतच उजव्या बाजुच्या दोन बरगड्यांनमधल्या स्नायुंना दुखापत झाली आहे. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. एआईजी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि सीटी स्कॅन केला आहे. आता मी हैद्राबादवरून घरी परतलो आहे. पट्ट्या बांधल्या आहेत आणि त्यावर उपचार सुरु आहेत. हे खूप त्रासदायक आहे, मला श्वास घ्यायला आणि हलायला त्रास होतोय. तर प्रकृती सुधारण्यास आठवडे जातील. सगळं नीट होण्याआधी जो त्रास होतोय त्यावर गोळ्या सुरु आहेत’, असे अमिताभ त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.