बाहेरगावच्या मुस्लिमांना मशिद प्रवेश बंदी, मोठ्या गावचा मोठा निर्णय

0
5

दि. 3 ( पीसीबी ) – पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे पिरंगुट गावातील ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेतला आहे. गावातील मशिदीमध्ये बाहेर गावच्या मुस्लिमांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे फलकही त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. एक मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.

पिरंगुट मशिदीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत होती. त्यामुळे येणारे लोकं नेमके कोण आहेत? त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मशिदीमध्ये येणाऱ्या लोकांकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत ही बंदी घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या बैठकीला स्थानिक मुस्लीम बांधवांची देखील उपस्थिती होती.

दरम्यान पिरंगुटमध्ये शुक्रवारच्या नमाजसाठी येणाऱ्या लोकांचे ओळखपत्रं स्थानिकांकडून तपासले जाणार असल्याचंही यावेळी पिरंगुटचे पोलीस पाटील प्रकाश पवळे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ” ग्रामस्थ मंडळींची मिटींग झाली. त्यात मुस्लीम आणि इतर जाती धर्मातले लोकं उपस्थित होते. शुक्रवारी बाहेरील लोक अधिक येत असल्याने रहदारीला अडथळा येत आहे. गावातील कॉलेजच्या मुला-मुलींना जायला रस्ताच मिळत नव्हता. त्यांनी तक्रार केल्यावर आम्ही मौलानांना विचारलं तर ते म्हणाले हे बाहेरचे आहेत. गेल्या दोन तीन शुक्रवार पासूनच हे लोक यायला लागले होते. त्यामुळे आता बाहेरच्या लोकांवर बंदी घालण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यातं आला आहे.

दुसरीकडे यावरून आता वाद देखील होण्याची चिन्ह आहेत, कारण स्थानिक मुस्लिमांच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आपण या बैठकीला उपस्थित होतो, परंतु असा काही ठराव होणार आहे, याची कल्पना आपल्याला देण्यात आली नव्हती, असा दावा पिंरंगुट मशिदीचे पदाधिकारी आमिर यांनी केला आहे. तसेच अशी कोणावर कशी बंदी घालणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

ग्रामसेभेत घेण्यात आलेल्या या निर्णयाचा ग्रामस्थांच्या वतीनं फ्लेक्स देखील लावण्यात आला आहे. ‘पिरंगुट गावामध्ये बाहेरून येणार्‍या सर्व मुस्लीम बांधवांना कळवण्यात येते की, समस्त गावकरी मंडळी, पिरंगुट व स्थानिक मुस्लीम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये गावामधील मशि‍दीमध्ये स्थानिक मुस्लीम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लीम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लीम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लीम बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने मशि‍दीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व शांतता यास अडथळा निर्माण होत आहे. तरी या ठिकाणी फक्त स्थानिक मुस्लीम बांधवच प्रार्थना करतील याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लीम बांधवांनी नोंद घ्यावी. समस्त गावकरी मंडळी पिरंगुट’ असा मजकूर या फ्लेक्सवर छापण्यात आला आहे.