बावऱ्या बैलांच्या पुढ्यात गौतमी पाटीलची लावणी

0
288

पुणे, दि. २८ (पीसीबी) : “सबसे कातिल गौतमी पाटील”, असं वाक्य आता तरुणाईच्या तोंडात सतत ऐकायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या कार्यक्रमात राडा होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. मात्र, आता गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. गौतमीचा चक्क एका बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात हा व्हिडिओ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाचे आयोजक सुशील हगवणे यांनी सांगितले की, “पूर्वीच्या काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची पद्धत होती. त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत होती. ही परंपरा कायम ठेवत गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला”, असल्याचे त्यांनी सांगितले.

सुशील हागवणे युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुळशी तालुक्यात एका विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चक्क कार्यक्रमासाठी बैल आणला होता. या बैलासमोर गौतमी पाटील हिने डान्स सादर केला. यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बैलासमोर नृत्य सादर केल्याने गौतमी आणि त्या बैलाची चर्चा सद्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे. ‘बावऱ्या’ असं त्या बैलाचं नाव असल्याची माहिती समोर आली असून त्या बैलाने देखील डान्स पाहून गौतमीला दाद दिली. बैलगाडा शर्यतीचे प्रतीक म्हणून या ‘बावऱ्या’ बैलाला येथे आणण्यात आले होते. ‘बावऱ्या’ या बैलाने आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. गावामध्ये सर्वांचा तो लाडका आहे. तसेच गावची शान असलेल्या या बैलाची नेहमीच चर्चा असते.