बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाही

0
282

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका मांडणारं आणखी एक ट्विट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी या माध्यमातून मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत यावं अशी भूमिका मांडली होती. शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, असं म्हटलं होतं. गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट करुन त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

एकनाथ शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….’ या ओळी ट्विटरवर पोस्ट करत शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केलं आहे.

एकनाथ शिंदे आनंदाश्रमाला भेट देणार –
गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जात असत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईत दाखल होत होते. मात्र, यावर्षीपासून यामध्ये थोडा बदल पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल. या बंडामुळं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं आणि एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाला.

शिवसेनेच्या बंडानंतर पहिली गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे.गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात हजेरी लावतील. एकनाथ शिंदे काही वेळ आनंदाश्रमात असतील. त्यामुळे त्यांचे समर्थक आमदार, नेते ठाण्यात येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना मानणारे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर श्रद्धा असणारे नागरिक ठाण्यातील आनंदाश्रमात दाखल होण्याची शक्यता आहे.